Pages

Friday, 27 February 2015

एक नव्हे प्रत्येक कार्यालयात "पोळ'

एक नव्हे प्रत्येक कार्यालयात "पोळ'


दीड वर्षांपूर्वी डॉ. दाभोळकर यांची गोळया घालून हत्या झाली. त्यांचा मारेकरी अद्यापही फरार आहे. मुळात सापडत नाही. किंवा दाभोळकरांना मारणारा आरोपीच नाही. अशा अनेक शक्‍यता वर्तविण्यात येत आहेत. 15 दिवसांपूर्वी क्रॉं. पानसरे यांची हत्या झाली. त्यांचे आरोपीही मोकाट. लोकांनी कार्यकर्त्यांनी कितीही डोके फोडले तरी आरोपी मिळणार नाहीत. दाभोळकर प्रकरणाची फाईल गुंडाळली आहे. आता क्रॉ. पानसरेंची फाईल बंद होईल, असे फेसबूक किंवा वृत्तपत्रातून लेख येणे सुरू झाले. या इशा-यांना काय म्हणावे, असे वाटते. पोलिस तपास सुरू आहे. पोलिसांना दुवा मिळत नाही. सर्व बरोबर आहे. पण फाईल बंद होईल हा इशारा किंवा सूचना कशाच्या आहेत, याकडे बारकाइने बघितले पाहीजे. विरोधक असेच प्रश्‍न उपस्थित करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. यातूनच अनेक अधिकारी सर्व काही प्रयत्न केल्याचे सांगण्यासाठी ज्योतीषीकडे जातात. किंवा मांत्रिकांकडे जातात. डॉ. दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांचा शोध लागत नाही म्हणून पुण्याचे पोलिस आयुक्‍त गुलाबराव पोळ यांनी जुनाट मार्गाचा अवलंब केला. तो म्हणजे एका मांत्रिकाकडे जावून शोध घेण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागात कोणाला करणी झाली तर अशा मांत्रिकांकडे जावून कोणी करणी केली, हे पाहण्यासाठी जातात. ग्रामीण भागात अशिक्षित आणि अडाणी भरपूर आहेत. त्यांचा जुनाटं चालीरितिंवर अंधविश्‍वास आहे, म्हणून ते जातात. यात काही शंका नाही. यात त्यांना किती लाभ होतो,हे त्यांनाच माहिती. कारण आतापर्यंत या"बोवा'कडे जावून हा फायदा झाला, असे सांगणारे आंधळे भक्‍त पुढे आले नाही. असो, पुणे, तिथे नाही उणे, असे साधारणतः बोलले जाते. महाराष्ट्रातील पुणे हे शहर. संस्कृतीचा वारसा जपणारे. सर्वाधिक सुसंस्कृत शिक्षित असा शहराचा गौरव केला जातो. त्या शहराचे तत्‍कालीन पोलिस आयुक्‍त गुलाबराव पोळ. डॉ. दाभोळकरांचे मारेकरी मिळत नाही, म्हणून ग्रामीण भागातील अशिक्षित आणि अंधभक्‍त वापरतात जो जुनाटं प्रकार मांत्रिकांचा पोलिस आयुक्‍तांनी वापरला. वापरला वाईट झाले किंवा बरे हा विषय महत्वाचा नाही. मात्र, त्यासाठी हा प्रकार का स्वीकारला, हे महत्वाचे आहे. दुसरे असे की, यातूनही त्यांना लाभ झाला नाही. डॉ. दाभोळकरांचे आरोपीही अद्यापही सापडले नाही. पोलिस आयुक्‍तांना माहीत होते, असे प्रकार कितीही केले तरी त्याचा लाभ होणार नाही. मात्र, ते अंधश्रध्देचा प्रकार त्यांनी केला. हा प्रकार त्यांनी का केला, यावर कारणविमांसा होणे गरजेचे आहे. असा शिक्षित आणि सरकारच्या पोलिस आयुक्‍त पदावर कार्यरत असलेल्या व्यक्‍तीच्या डोक्‍यात असे खुळ कसे येते, असा पहिला प्रश्‍न. नंतर हा प्रकार केल्यानंतर त्यांना आरोपी का गवसले नाही, हा दुसरा प्रश्‍न. असे प्रकार करण्यामागे काही घातपात तर नाही, हा तिसरा प्रश्‍न.
प्रत्येक प्रश्‍नावर प्रकाश टाकणे आवश्‍यक आहे. प्रत्येक प्रश्‍नांवर चर्चा होणे आवश्‍यक आहे.
महाराष्ट्र. पुरोगामी असल्याचा गवगवा केला जातो. तो फक्‍त राजकीय पोळी शेकणा-यांकडून. महाराष्ट्र हा कधी पुरोगामी नव्हता आणि कधी तो पुरोगामी होणार नाही. दहा टक्‍के पुरोगामी विचार सरणीचे असल्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी होतो, असे नाही. तर पुरोगामी हा शब्दच भ्रम निर्माण करणारा आहे. हे सांगण्यामागील कारण हेच की पोलिस आयुक्‍त पोळ यांनी केलेला हा त्यांचा किंवा त्यांच्या विभागाचा पहिलाच प्रकार नसेल. अनेक वेळा लपूनछूपून असे कारनामे केले असतील. पण हाती काहीच आले नाही. असे प्रकार का होतात. लोकांच्या मनामध्ये आजही देव-देव आहे. भारतीय राज्य घटनेने घरातील देव्हा-यात बसून देव-देव करावे, सांगितले. तसा अधिकारीही दिला आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी हा देव-देव आला. तो तिथेच थांबला नाही तर अधिकारी त्यांचा वापर सर्रास कार्यालयात करीत आहेत. सरकारी कार्यालयातील भिंती महापुरूषांच्या छायाचित्राने भरल्या नाहीत. त्या विविध जाती-धर्माच्या देवांनी फुललेल्या आहेत. यामुळे आपण अधिकारी आहोत, याची जाणीव त्या अधिका-यांना होत नाही. टेबलासमोर काम करताना आठ तास देव-देव दिसत असेल तर त्यांच्या हातून निरपेक्ष काम कसे होईल, याची शाश्‍वती देता येत नाही. म्हणूनच महाराष्ट्रात जो धार्मिक भष्ट्राचार सर्व ठिकाणी वाढला, त्याला फक्‍त देव-देव जबादार आहे. धर्म-साधना करायला हरकत नाही, भारतीय राज्य घटनेने तो अधिकार दिला आहे. पण,तो कुठे करावा, हेही सांगीतले आहे.
सध्या सरकारी कार्यालयामध्ये देव-देव चा बाजार सुरू आहे. तो प्रचंड विघातक आहे. जागोजागी या बाबांचे त्या देवांचे छायाचित्र लावले आहेत. अनेक ठिकाणी रोज आरती होते. लाल टिळा लावला जातो. सरकारी कार्यालयाला देवालयाचे स्वरूप आले आहे. कार्यालयात अधिकारी वेळेवर येत नाही. जेव्हा येतात आपला देव-देव सुरू होते. दहा- साडेदहा वाजता कार्यालयात गेले तर प्रत्येक कार्यालयामध्ये पूजापाठ दिसून येईल. गेल्या 65 वर्षांत असे प्रकार कमी होण्याऐवजी वाढत आहेत. असे का होत आहे, याचा विचार प्रत्येकांनी केला पाहीजे. भारत हे धर्मनिरपेक्ष देश आहे. प्रत्येकांना येथे स्वातंत्र्‌य दिले आहे.सरकारी कार्यालयात येणारा व्यक्‍ती विविध जातीधर्माचा असतो. समोर एखाद्या देवाचे छायाचित्र दिसले तर तो कर्मचारी आपले काम करणार काय, असा प्रश्‍न त्याच्या मनात प्रथम येतो. तो बिनधास्तपणे कामाचे बोलत नाही. यातून "आपल्या' माणसाची शोध-शोध सुरू होते. येथून मग कामाचे विभाजन होते. आपल्या माणसाचे लवकर काम आणि इतर जातीधर्माच्या लोकांचे काम नंतर. कधी-कधी कामही होताना दिसत नाही. यातून लोकांच्या मनामध्ये सरकारी कर्मचा-यांविषयी प्रचंड रोष आहे. अधिका-यांना हे केव्हा समजणार की, आपण सरकारी कार्यालयामध्ये काम करतो, आणि तो पैसा सरकार देते. आणि सरकार हा पैसा सर्वजातीधर्माच्या लोकांकडून कर स्वरूपात वसूल करते. अशा वेळी कमी-कमी सरकारी कार्यालयात तरी आपण देव-देव सोडला पाहिजे. देव-देव हा प्रकार आठ तास काम करताना बाजूला सारू शकत नाही. याचाच अर्थ की आपल्या डोक्‍यात धर्मवेड किती भिनले आहे. असाच प्रकार गुलाब पोळ यांनी केला. पाेळ यांच्यावर कारवाई झाली. दाेन दिवसांपूर्वी एका माजी उपमुख्यमंत्र्‌याने सांगीतले. पण पाेळ यांनी असे का केले?.
पोलिस आयुक्‍त गुलाब पोळ यांच्या हाताखाली विविध जातीधर्माचे लोक काम करतात. अशावेळी असे प्रकार करताना त्यांच्या मनात थोडा तरी विचार येत नाही,याचा अर्थ असे अधिकारी हा प्रकार जाणून-बुजून करतात, असे वाटते. धर्माच्या नावाखाली आपण काही करू शकतो, आणि आपण अधिकारी असल्यामुळे कोणी आपल्याला काही म्हणू शकत नाही, असा मुजोरी विचार पोळ सारख्या अधिका-यांमध्ये येतो. पोळ सारखे अनेक अधिकारी प्रत्येक कार्यालयामध्ये कधी- या बाबांच्या तर कधी त्या बाबांच्या नांदी लागलेले दिसून येतात. हे लोक जनतेची काय कामे करणार. यामुळेच आपला देश मागे आहे. काम कधी आणि सर्व गोष्टी "देव-देव'सापडल्या आहेत. यासंदर्भात सरकारने ठोस पावले उचलली पाहिजे. थोर महापुरूषांच्या छायाचित्राव्यतिरिक्‍त इतर बुवा-बाबांचे छायाचित्र कार्यालयात लावण्यात येवू नये. मात्र, सरकार असे करणार नाही. सरकारमध्ये बसलेल्या सर्वांच असे वाटत आहे. लोकांना धर्माची गुंगी देवून स्वतःची पोळी शेकणारे हे सरकार याकडे मुळातच लक्ष देणार नाही. कारण हाच त्यांचा ऐजंडा आहे.




चंद्रशेखर महाजन


No comments:

Post a Comment