"व्हीजनलेस रिपाईं ऐक्याचा' पुन्हा राजकीय धंदा
निवडणुका आल्या की, मृतावस्थेत असलेल्या राजकीय पक्षांना संजीवनी मिळते. नेते, कार्यकर्ते कामाला लागतात. राष्ट्रीय अध्यक्षांपासून तर गावगल्लीतील अध्यक्षांपर्यंत नियुक्तीचे वारे वाहू लागतात. त्याचे लोण आता रिपब्लिकन नेत्यांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या 56 वर्षांपासून "व्हीजनलेस' नेत्यांच्या विळख्यात सापडलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'पक्ष कधीच पूर्णपणे राजकीय होऊ शकला नाही. व्हीजनलेस नेत्यांमुळे झालेली पक्षाची बर्बादी समाज मुकाटयाने सहन करीत आहे. आता 2014 च्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. नेत्यांनी पुन्हा रिपाइं ऐक्याचा राजकीय धंदा सुरू केला आहे. ....................................................................................................................................
2014 मध्ये महाराष्ट्रातील विधानसभासह लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. कधीकाळी विधानसभेत प्रमुख विरोधीपक्ष आणि केंद्रामध्ये 14 पेक्षा अधिक खासदार देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाटचाल पाहाता हा पक्ष नेत्यांमध्ये प्रचंड विखरूलेला आहे. आणि या पक्षाच्या ऐक्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांचा सुध्दा पुन्हा एक पक्ष तयार होतो. तर तो पक्ष कोणतीही पूर्व तयारी न करता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा प्रयत्न करतोय. यामुळेच "एक ना धड भाराभार चिंध्या' अशी अवस्था या पक्षाची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार रामदास आठवले आणि गवईपुत्र राजेंद्र गवई यांना रिपब्लिकन ऐक्याची स्वप्ने पडू लागली आहेत. युतीच्या नावाखाली संपूर्ण समाजाला आणि जनतेला कॉंग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना या राजकीय पक्षांच्या दावणीला बांधण्याची या नेत्यांची सवय गेली नाही. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा रिपाइं ऐक्याचा राजकीय धंदा सुरू केला आहे. हा धंदा कितपत बहरतो हे 2014 निवडणूकच सांगेल. ऐक्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे रामदास आठवले यांनी रा.सू. गवई यांच्या विहारात जावून त्यांचे दर्शन घेतले. तेव्हापासून ऐक्यप्रेम उफाळून आले आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. सुरूवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय स्तरावर या पक्षाने मोठी कामगिरी केली. यानंतर पदहव्यापोटी दादासाहेब गायकवाड, बॅरि. खोब्रगाडे, रा.सू. गवई, प्रकाश आंबेडकर,रामदास आठवले या नेत्यांनी स्वतःला कॉंग्रेस पक्षाच्या दावणीला बांधले. संघटनेवर भर न देता फक्त जातीपुरते राजकारण करून स्वतःच्या पदासाठी त्यांनी संपूर्ण समाजाची नेत्यानी दिशाभूल केली.
तोच सिलसिला गेल्या 57 वर्षांपासून सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नावाने एक दोन नव्हे तर चक्क 50 पेक्षा अधिक पक्ष समोर आले आणि त्या पक्षाचे सर्वच नेते राष्ट्रीय अध्यक्षाच्या रांगेत बसले आहेत. मात्र, त्या पक्षाच्या बांधणीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न फक्त भाषणापुरतेच मर्यादित आहेत.
कधी खासदार, कधी सभापती तर कधी आमदार बनून तेच तेचे चहेर समाजपुढे येवू लागले. मात्र, त्या नेत्यांनी आपले अस्तित्व धोक्यात येईल, म्हणून नवीन राजकीय पिढीच समोर येऊ दिली नाही. ज्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला; त्यांनाच संपपिण्याचे काम या राजकीय धुरिणांनी केले आहे. यामुळे कॉंग्रेस किंवा इतर समांतर पक्षांना रिपब्लिकन पक्ष संपविण्यासाठी मेहनत घ्यावी लागली नाही. "पद मिळाले नाही तर काढ राजकीय पक्ष',अशी भूमिका रिपाइं नेत्यांनी घेतली आणि त्याचे परिणाम आज समाजासमोर आहेत. रा.सू. गवई यांनी पक्ष स्थापनेपासून कॉंग्रेसची हातमिळवणी केली. तो आजगातायत सुरूच आहे. वयाच्या उर्तरार्धातही त्यांनी कॉंग्रेसची दोरी सोडली नाही. यामुळे त्यांना राज्यपाल,खासदार, सभापती आणि इतर पदे मिळत गेली. आता ते थकले आहेत. यामुळे त्याचा मुलगा डॉ. राजेंद्र गवई पक्षाची धुरा सांभाळत आहे. मात्र, त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य नसल्यामुळे हा पक्ष फक्त गवई फॅमिलीपुरता मर्यादित झाला आहे.
युतीच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजणा-यांचे मनसुबे जनतेसमोर उघडे पडले आहे. यामुळे आता या नेत्यांवरून जनतेला विश्वास उडाला आहे. स्वतःची उरली-सुरली इभ्रत वाचविण्यासाठी पुन्हा त्यांनी ऐक्याचा नारा दिला आहे. राजेंद्र गवई तर प्रकाश आंबेडकर यांनी सुध्दा ऐक्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करीत आहेत. महत्वाचे म्हणजे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्ष भारिपबमसं काढला तेव्हापासून कधीही या नेत्यांच्या आवाहनाला त्यांनी थारा दिला नाही. केवळ त्यांची टिंगल टवाळकी करीत आले. कारण ऐक्याचे आवाहन करीत असताना या नेत्यांसमोर व्हीजन नाही. फक्त बाबासाहेबांच्या नावाने भावनिक हाक देऊन स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला आहे.
यामुळे रामदास आठवले आणि राजेंद्र गवई यांचा ऐक्याचा राजकीय धंदा किती दिवस चालतो हे पाहणे महत्वाचे आहे. प्रकाश आंबेडकर सोबत येत नसतील तर स्वतःच यांनी राजकीय संघटन महाराष्ट्रात मजबूत करून दाखवावे. परंतु,हे नेते दोन्ही काम करणार नाहीत. कारण यांच्यासमोर व्हीजन नाही.
-चंद्रशेखर महाजन
नागपूर
मो. 9850209710
chandra_mchandra@yahoo.co.in
बाबासाहेबांच्या नावाने पाेळी शेकणा-यांसाठी.............
ReplyDelete