तर होय, महाराष्ट्र पुरोगामी आहे
अण्णा गेले. क्रॉ. गोविंद पानसरे. मी महाराष्ट्राला पुरोगामी मानत नाही, हे सांगून गेले. तरीही महाराष्ट्र पुरोगामी असल्याची शपथ त्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी हजारो कार्यकर्त्यांनी घेतली.आपण ज्या महाराष्ट्रात राहतो. त्या महाराष्ट्रात संत तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासारखे अनेक संत-थोरपुरूष जन्माला आले. असे महाराष्ट्रात घडत असलेल्या घटनावरून वाटत नाही. मात्र, हे सत्य आहे. या थोर महापुरूषांनी डोकेफोडून-फोडून सांगीतले तरी येथील लोकांनी त्यांचे काही ऐकले नाही. त्याचे परिणाम आता प्रत्येक बहुजनांना भोगावले लागत आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या काळापासूनच पुरोगामी आणि प्रतिगामी हे दोन विचार महाराष्ट्रात प्रकर्षांने जाणवत आहेत. ऐकीचे बळ आणि नियोजन नसल्यामुळे पुरोगामी विचारांची पेरणी करताना प्रत्येकांना "बळी' जावे लागले. वैकुंठाला गेले ते तुकाराम महाराज असोत की, आताचे डॉ. दाभोळकर आणि आठ दिवसांपूर्वींचे ऍड. गोंविद पानसरे असोत. प्रत्येकांना बळी जावे लागले ते पुरोगामी विचारांची पेरणी करतांना.
प्रबोधनकार ठाकरे यांनी सुध्दा आपल्या साहित्यातून बहुजन समाजाला जागविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले.आपल्यास माणसांवर अन्याय अत्याचार करण्याची प्रवृत्ती बहुजन समाजाच्या रक्तात ऐवढी भिनली की, आपल्याच भावाचे मुंडके कापण्यास त्यांनी मागे पुढे पाहीले नाही. ते भंडारा जिल्हयातील खैरलांजीचे हत्याकांड असो की, अहमदनगर जिल्हयातील हत्याकांड असोत. यात गर्वाने आपल्याच भावंडाचे आपण हत्या करीत आहोत, त्याचे भानही त्यांना नव्हते. मुंडके उडविण्याच्या शर्यती लागल्या. तो समाज बौध्द असो की, आदिवासी. त्यांचे मुंडके सहज उपलब्ध होते म्हणून त्यांच्यावर वार करायचे.मोर्चे झाले, आंदोलन झाली. शेकडोंना तुरुंगवास झाला. तरीही बहुजनांना मित्र कोण आणि शत्रू कोण कळले नाही. प्रत्येक वेळी संधी मिळाली. मात्र, त्यांनी संधी ही आपलीच आहे हे कधीच हेरली नाही.
दुस-यांचे मुंडके उडत आहेत ना? मग काळजी कशाला. मुंडके उडविणा-याला आता मुंडके मिळेनासे झाले. यामुळे आतापर्यंत बध्याची भूमिका घेणारे आमचे बहुजन बांधव त्यांना दिसले. आणि त्यांचे मुंडकेच छाटणे सुरू झाले. यातूनच डॉ. दाभोळकर गेले. आठ दिवसांपूर्वी क्रॉ. पानसरे गेले. तरीही आमच्या बहुजनांना आपला मित्र कोण आणि शत्रू कोण कळले नाही. डॉ. दाभोळकर आणि क्रॉ. पानसरे ही सुरूवात आहे, असे म्हणणारे असंख्य बहुजन आपल्याला फेसबुक आणि रस्त्यावर चर्चा करताना मिळतील. मात्र, आपले मित्र कोण शूत्र कोण हे ओळखण्याची बुध्दी त्यांना अद्यापही आली नाही.
बौध्द,आदिवासी या सख्ख्या शेजा-यांच्या घरी लावलेली आग आपल्याघरापर्यंत आली हे बहुजनांना अद्यापही कळले नाही. कारण तुकाराम महाराजांपासून तर आताच्या क्रॉ. पानसरेपर्यंत देव नाही सांगूनही आपण देव-देव करीत आहोत. म्हणूनच मुंडके छाटणा-यांची हिंमत बहुजनांच्या घरापर्यंत झाली. बहुजनांनों आताही वेळ गेली नाही. आपण ज्या महाराष्ट्रात राहातो तो पुरोगामी नाही. तो फक्त सांगण्यासाठी आहे. हे ओळखा. शूत्र आणि मित्र कोण. या महाराष्ट्रात संत तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा चूकून जन्म झाला. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू गावात झाला. वाद नको.)
ज्या महाराष्ट्रात पुरोगामी असल्याचे गोडवे गायले जातात. त्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळयांची विटंबना होतेच कशी. ज्या महाराष्ट्राचे पुरोगामी असल्याचे गोडवे गायले जातात; त्या महाराष्ट्रात आदिवासी आणि बौध्दांवर अत्याचार होतातच कसे. ज्या महाराष्ट्रात महिलांची आब्रू वेशीवर टांगली जाते, ज्या महाराष्ट्रांत बहुजनांमध्ये वाद निर्माण करून सत्तेची पोळी भाजली जाते, तो महाराष्ट्र पुरोगामी कसा. पुरोगामी म्हणजे फक्त महापुरूष जन्माला आले म्हणून. नाही. डॉ. दाभोळकरांची दिवसाढवळया हत्या होते. क्रॉ. पानसरेंना गोळी घालून ठार मारले जाते. तो महाराष्ट्र पुरोगामी कसा असू शकतो. चांगल्या विचारांची वारंवार हत्या होणे हे जे पुरोगामी होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता असेल तर महाराष्ट्र पुरोगामी आहे या शंका नाही. खरचं ही पात्रता योग्य आहे काय? हा प्रत्येकांनी शोध घेण्याची गरज आहे. बहुजन मित्राने आतातरी ओळखा आपला शत्रू कोण आणि मित्र कोण?
चंद्रशेखर महाजन
No comments:
Post a Comment