यापूर्वी देशात महात्मा गांधी यांची दांडी यात्रा गाजली. तिने इतिहास निर्माण केला. ब्रिटिशांच्या विरोधात केलेले हे फार मोठे बंड होते. त्यानंतर विनोबा भावे यांची भूदान यात्रा अनेकांच्या स्मरणात आहे. तर नागपुरातून प्रा.जोगेंद्र कवाडे यांचा लॉंग मार्च जगातील दुसरा लॉंग मार्च ठरला. प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा लॉंग मार्च हा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी होता. हा लॉंग मार्च आंबेडकरी जनतेसाठी माईल स्टोन ठरला. जगातील दुसरा ‘लॉंर्ग मार्च’ समाज परिवर्तनाचा दिशादर्शक स्तंभ ठरला. १४ वर्षे या लॉंग मार्चची घराघरांत चर्चा होती. त्यानंतरही चर्चा होत आहे आणि होत राहील. समाज यानिमित्त एकत्र आला. आंदोलन करू लागला. तोच काळ दलित पॅंथरने गाजविला.
समाजाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना अद्दल घडविण्याचे महाशस्त्र मिळाले. लॉंग मार्च आणि दलित पॅंथरने समाजाला मोठे नेते दिले. राजा ढाले, ज.वी. पवार, रामदास आठवले, नामदेव ढसाळ, प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, भाई संगारे, अविनाश महातेकर अरुण कांबळे,मनोहर अंकुश, , दयानंद म्हस्के, गंगाधर गाडे, प्रीतमकुमार शेगांवकर अशा अनेक नावांची यादी जाहीर करता येईल. त्याच काळात रा.सू. गवई उदयास आले. त्यावेळी निर्माण झालेले नेते आज समाजधुरीण म्हणून पुढे आले आहेत. त्यानंतर अनेक स्थित्यंतरे घडली. घराघरांतून निघालेली कार्यकर्ते, नेत्यांची फौज आता कुठे तरी थांबली आहे. गेल्या ५० वर्षांत अनेक बदल घडून आले. बौद्धांच्या हक्काची लढाई असो की मंडल आयोगाची लढाई असो यात आंबेडकरवादी बौद्ध समाज नेहमीच पुढे राहिला आहे. दलित पँथर आणि नंतर सामाजिक संघटनांनी परिवर्तन घडवून आणले. दलित नाट्य संमेलन, दलित साहित्य संमेलन यासारखे सांस्कृतिक परिवर्तनही यातून घडले. शेकड्याने साहित्यिक पुढे आले. लेखक झाले. लोक लिहू लागले. बोलू लागले. जाहीर भाषणे होऊ लागले. लोकांना बोलण्याची संधी मिळू लागली. यातून वक्ते निर्माण झाले. गावागावांत बोलणाऱ्यांची संख्या वाढली. लोक संघटित झाले. चौकाचौकांतील भाषणांनी शिक्षणाची प्रेरणा मिळाली. शिक्षणाचे महत्त्व कळू लागले. नव्या दमाचा आणि ताकदीचा युवक समाजाला मिळाला. गावागावांत झेंडे फडकू लागले. झेंड्यांसाठी प्रसंगी आंदोलनही झाले. बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकरांच्या तसबिरी घराघरांत दिसू लागल्या. सावित्री, रमाईत महिला स्वतःला शोधू लागल्या. आंबेडकर जयंती मिरवणुकी निघू लागल्या. पांढऱ्या वस्त्रांचा खपही वाढू लागला. शहर असे की गाव प्रत्येकामध्ये निळ्या क्रांतीच्या ज्वाला भडकू लागल्या. अन्याय-अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ मिळू लागले आणि ते एकवटूसुद्धा लागले. हा निळ्या पाखरांच्या कसोटींचा तसाच त्यांच्या भरभराटीचा काळ होता. बाबासाहेबांच्या विचारांवर चर्चा होऊ लागल्या. बौद्धांच्या वस्त्या उजळू लागल्या.
हा काळ परिवर्तनाचा होता. विद्यार्थी घडू लागले. युवक शिक्षण घेऊन नोकरीला लागले. अधिकारी झाले. साहित्यिक झाले. प्राध्यापक झाले. शाळा सुरू झाल्या. महाविद्यालय सुरू झाले. त्यांना बाबासाहेबांचे नाव दिसू लागले. हा बदल घडून आला तो लॉंग मार्च आणि दलित पॅंथरमुळे.शेकड्याने संस्था, संघटना सोबतीला होत्याच. यात शंका नाही. प्रत्येक आंबेडकरवादी बौद्धांनी स्वतःमध्ये पुढारीपण शोधले. सामाजिक आंदोलनाची ही मशाल ९० च्या दशकात दुभंगू लागली. तर तिचा प्रभाव मात्र, २००५ पर्यंत कायम होता. तो प्रभाव खैरलांजी हत्याकांडाविरोधातील आंदोलनाने दिसू लागला. ही सामाजिक आंदोलनाची घडी पुढे विस्कटू लागली. ती आताही विस्कटत आहेत. सामाजिक आंदोलनातून पुढे आलेले नेते आणि राजकारणातून आलेल्या नेत्यांमध्ये विश्वासर्हतेची मोठी दरी निर्माण झाली. यातून समाजातील एकोपा बिघडू लागला. बौद्ध वाड्या न जाणारा पक्ष त्या वाड्याच नव्हे तर घराघरांत दिसू लागला आहे. त्यांच्या नेत्यांच्या तसबिरी आता बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या बरोबरीने दिसू लागल्यात. याला परिवर्तन म्हणावे की समाजाचे संतुलन बिघडले म्हणायचे, यावर खरी परिचर्चा घडवून आणता येते. यातून अस्पृश्यता दूर झाली म्हणायची पण सोय नाही. कारण त्याला दोन्ही समाज घटकांची मान्यता हवी आहे. हा एकतर्फी बदल बौद्धांमध्ये दिसून येत असला तरी बौद्ध स्वतःच्या चेहरा मात्र, हरवून बसला आहे. आंबेडकरवादी बौद्धांची प्रतिमा आता आंबेडकरवादी बहुजन होत आहे. दलित साहित्यिकांची जागा बहुजन साहित्यिकांनी घेतली. आता आंबेडकरी बहुजन साहित्यिक पुढे येत आहेत. हे परिवर्तन म्हणायचे काय, हा खरा प्रश्न आहे. कारण नाव बदलत असे तरी यात भूमिका मात्र, बौद्धांचीच आहे. बौद्धांची मूळ भूमिका सोडून तो नव्यानव्या भूमिका स्वीकारत आहे. ही भूमिका आता सोंगाड्यांच्या भूमिकासारखी वाटू लागली आहे. खरे तर बहुजन समाजाच्या हक्काचा लढा बहुजनांनी लढणे अपेक्षित आहे. पण, असे होताना दिसून येत नाही. बहुजन आपल्या कर्मकांडातच अडकलेला आहे. त्यांचा लढा आतापर्यंत आंबेडकरवादी बौद्धांनी लढला. त्याला यशही मिळाले. मंडल आयोगाचा लढा ही आंबेडकरवादी बौद्धांच्या लढ्याची फलश्रृती म्हणावी लागेल. असे अनेक सामाजिक आंदोलन आंबेडकरवादी बौद्ध लढले. बहुजनांच्या हक्काचा लढा आपला लढा म्हणून लढले आणि आता स्वतःचे लढे विसरायला लागले.
सामाजिक बदल; राजकीय परिवर्तनात अपयश
आंबेडकरवादी बौद्धांनी बऱ्याच सामाजिक परिवर्तनाच्या लढाया लढल्या. परिवर्तनाच्या अनेक लढ्यात त्यांना यशही आले. बौद्धांच्या आरक्षणाचा प्रश्न. रमाबाई नगर हत्याकांड, नामांतर असो की खैरलांजीपर्यंतच्या सामाजिक लढ्यात अपेक्षित परिवर्तन झाले. मात्र, राजकीय परिवर्तनाच्या लढ्यात मात्र, सर्व पातळ्यांवर अपयश आले. जे नेते दलित पॅंथर, नामांतर लढ्यात नेते म्हणून उदयास आले, ते नेते सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनात हिरो होते. समाजाच्या गळ्यातील ताईत होते. नुसते भाषण ऐकण्यासाठी तासनतास वाट पाहणारे कार्यकर्तेही होते. या आंदोलनातील हिरो मात्र, राजकीय परिवर्तनाच्या आंदोलनात झिरो ठरले. राजकीय परिवर्तनात मिळालेले अपयश हा समाज पचवू शकला नाही. राजकारण आणि सामाजिक चळवळ हे वेगवेगळे असल्याची जाणीवही फार कमी लोकांना झाली. त्यात धर्मकारण व राजकारण त्यांच्या पंगतीला बसले. यातून ही वैचारिक हानी झाली, ती आता भरून काढणे आवश्यक आहे. आता धम्म कारणातूनच सामाजिक परिवर्तन करणे शक्य आहे. त्यासाठी बौद्धांनी एकत्रित येऊन काही सामुहिक अजेंडा राबविण्याची गरज आहे. म्हणूनच बौद्ध जोडो हे अभियान राबविणे आवश्यक आहे.
धम्म मेळावे
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई, ठाणे आणि नांदेड येथे धम्म मेळावे घेतले. या मेळाव्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे मेळावे काही राजकीय नव्हते. सर्वच पक्षातील बौद्धांनी या मेळाव्यात सहभाग नोंदविला. आजही लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुबिंयाविषयी प्रेम आणि आस्था आहे. धम्मकारणातून समाज हे एकसंध बांधू शकतात, याची जाणीव लोकांना आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बौद्ध जोडो अभियान राबविणे आवश्यक आहे. याकरिता प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकर घेतल्यास त्यांचा इम्पॅक्ट चांगला राहू शकतो. किंवा त्यांनी भारतीय बौद्ध महासभेला बळ दिले तरी बौद्धांच्या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
बौद्ध जोडोची गरज का?
खरं तर बौद्ध जोडो अभियान कशासाठी हा प्रश्न अनेकजण विचारतील. दुसरे बहुजन समाज जोडो अभियान का नाही. असे एका ना अनेक सवाल विचारले जातील. त्यांच्या सवालांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आंबेडकरी बौद्धांचा आतापर्यंतचा इतिहास आंदोलनाचा आहे. तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत नेहमीच पुढाकार घेतला आहे. एवढेच नव्हेतर त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनाचे नेतृत्वही केले. महाराष्ट्रातून सुरू झालेला आंदोलनाचा वणवा हा देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचे कामही या समाजाने केले. बहुजनातील अनेक प्रमुख नेतृत्व घडविण्याचे कामही या समाजाने केले. मात्र, या परिवर्तनाच्या लढ्यात आंबेडकरी बौद्धांनी स्वतःच्या सीमा पार केल्या. स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. १९५६ नंतर बाबासाहेबांचे ‘भारत बौद्धमय करेन’ हे वाक्य त्यांच्या स्मृतीतून लोप पावत आहे.
खरं प्रत्येक समाजाने आपली परिवर्तनाची लढाई लढाईची असते. पण,बौद्धांनी प्रत्येक समाजाची लढाई लढली. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असो. महिला अत्याचाराचा प्रश्न असो अंधश्रद्धा निर्मूलनाची समस्या, यात प्रत्येकवेळी पुढाकार घेतला. तो लढा छातीवर झेलला आहे. यातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील बौद्धांचे संघटीकरण होऊ शकले नाही. परिवर्तनाच्या लढ्यातील बहुजन नेते मात्र, मोठे होऊन राजकारणात स्वतःला प्रस्थापित केले. मात्र, यात बौद्ध नेते प्रस्थापित होऊ शकले नाही. रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पक्ष हे त्यांचे हक्काचे पक्षात आता मृत्युशय्येवर आहेत. या परिवर्तनाच्या लढ्यातून मोठे झालेल्या नेत्यांनी कधीही बौद्धांच्या सामाजिक प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. राखीव मतदारसंघातून निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. गेल्या काही वर्षांत समाजात शिक्षित वर्गाची संख्या वाढली. तरी त्याचा इम्पॅक्ट मात्र, बौद्ध समाजावर दिसून येत नाही. उलट उच्च शिक्षित असून त्यांच्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. अत्यंत कमी पगारात नोकरी करीत आहेत. खासगी नोकरीत प्रचंड शोषण सुरू आहे. जाणूनबुजून त्यांचे पगार वाढविले जात नाही. कामात त्यांना नेहमी टार्गेट केले जाते. प्रमोशन आणि इतर सुविधा तर फार दूरच्या आहेत. असे असतानाही त्यांचा आवाज दाबल्या जात आहे. काही मोजक्या पक्षात असलेला बौद्ध आता भाजपसारख्या पक्षातही ठाण मांडून आहे. कॉंग्रेस,भाजप असो की आप, इतर पक्ष राजकारणात मात्र, त्यांना वेळोवेळी डावलत आहेत. हिंदू दलित आणि बौद्ध दलित अशी विभागणी करून राजकारणात अस्पृश्यता निर्माण करीत आहेत. एवढेच कशाला सध्यास्थितीत धम्मविधी सुद्धा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करायला लागला आहेत. धम्मात सुरू असलेली मनमानी येणाऱ्या काळात बौद्धांची डोकेदुखी ठरणार आहे. आधीच राजकारणात अस्पृश्य ठरलेला हा समाज आता धम्म कार्यात इतर धर्माचे अनुकरण करीत आहे. राजकीय पक्षाच्या दावणीला बांधून धम्मात लुडबूड सुरू आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. जो येईल तो धम्मात आपले ज्ञान पाजळत आहेत. स्वतःचे गट तयार करून धम्मविधीमध्ये वेगळेपण जपत आहेत. यातून येणाऱ्या काळात खरा धम्म कोणता आणि त्यांच्या विधी कोणत्या, असा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारत येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांच्या जीवनयापनासाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ दिला. या ग्रंथाकडे आता दुर्लक्ष होऊ लागले. समाजातील प्रत्येकजण धम्मविरोधी विधीचे लिखाण करीत आहेत. अशाप्रसंगी केंद्रीय नेतृत्त्वातून धम्म विधी आणि त्यातील बदलाची अपेक्षा आहे. भदंतसुद्धा प्रत्येकजण आपल्या पद्धतीने धम्म सांगत आहेत. कधी-कधी तर बुद्ध विष्णूचा आठवा अवतार आहे हे सुद्धा परित्राण पाठात सांगतात. अशा अनेक गोष्टी आहेत, त्यावर एकवाक्यता होणे आवश्यक आहे. याकरिताच बौद्ध जोडोची गरज आहे. भ्रमिष्ट अवस्थेतून बाहेर काढण्याची योग्य वेळ आहे. ही वेळ गेली तर भविष्यात धम्मविरोधी विधीत मोठी भेसळ होऊ शकते.
-चंद्रशेखर रामदास महाजन
प्लॉट क्र. ५९, जनसेवा हाउसिंग सोसायटी,
भारत
गोडावूनच्या मागे, नीलकमलनगर,
नरसाळा रोड, नागपूर.
मो. ९८५०२०९७१०


