Pages

Sunday, 23 October 2016

हिरक महोत्सवाला तरी व्हावे "ऑडिट'

हिरक महोत्सवाला तरी व्हावे "ऑडिट'


"बुद्धं शरणं गच्छामि' अशी धम्मदीक्षा नागपूरच्या दीक्षाभूमीवर 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 5 लाख अस्पृश्‍य बांधवांना दिली आणि ते बुद्धाला शरण गेले. हिंदू धर्मातील जातिभेद आणि कर्मकांडाविरुद्ध बाबासाहेबांनी अखेरच्या क्षणापर्यंत लढा दिला. जातिभेदाचे चटके त्यांनी सोसले; म्हणून आपल्या कोट्यवधी अस्पृश्‍य बांधवांना या जातिभेदाच्या चिखलातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील 1935च्या अस्पृश्‍यांच्या परिषदेत त्यांनी धर्मांतराची घोषणा केली. "मी हिंदू धर्मात जन्मलो, तरी त्या धर्मात मरणार नाही', अशी घोषणा केली. एकूणच हिंदू धर्मातील जातिभेदावर त्यांनी प्रहार केला. मुळात हिंदू धर्मात सुधारणा व्हावी, ही त्यांची इच्छा होती. वाईट चालीरीती आणि भेदाभेद हिंदू धर्माला मारक होत्या. स्पृश्‍यांनी आपले बांधव असलेल्या अस्पृश्‍यांना स्वीकारावे म्हणून त्यांनी तब्बल 20 वर्षे वाट पाहिली. मात्र, त्यानंतरही आपल्याला स्वीकारले जात नाही म्हणून त्यांनी मूळ भारतीय असलेल्या आणि मानवी कल्याणाचा सार असलेल्या बौद्धधम्माला जवळ केले. केळूसकर गुरुजींनी त्यांना लहानपणी बुद्धाचे पुस्तक वाचायला दिले होते. माणसाला माणूस समजणारा हा धम्म त्यांच्या ध्यानात होता. या धम्माचा त्यांनी अभ्यास केला. अखेर 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी त्यांनी नागपूर येथे पाच लाख अस्पृश्‍यांना बौद्धधम्माची दीक्षा दिली.
आज, धम्मदीक्षेचा 60 महोत्सव बाबासाहेबांचे अनुयायी साजरा करीत आहेत. महामानवाने दिलेल्या या हीरकमहोत्सवी बौद्ध दीक्षेची, त्यांच्या विचारांवर आपण कितपत मार्गक्रमण केले, याचे "ऑडिट' करण्याची गरज प्रत्येक समाजधुरिणाला आवश्‍यक आहे. गेल्या 60 वर्षांत अनेक स्थित्यंतरे झाली. "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या आदेशाचे पालन झाले. मात्र, यातील "संघटित' शब्दाला समाजानेच मर्यादा घातली. कोणाचीही हाक नसताना दीक्षाभूमीवर दरवर्षी दहा लाखांपेक्षा अधिक अनुयायी येतात. शिक्षणातसुद्धा सवर्णांच्या खांद्याला खांदा लावून हा समाज पुढे आला आहे. हे बाबासाहेबांच्या विचाराचे मोठे यश आहे. मात्र, संघटित होताना या समाजाने कच खाल्ली. प्रत्येकाने बाबासाहेबांचे नाव पुढे करून स्वतःला मर्यादित करून ठेवले.
आज, समाजापुढे अनेक प्रश्‍न आहेत. रोजगार, आरक्षण आणि यासोबतच उच्चशिक्षितांचे प्रश्‍न समोर येत आहेत. कधीकाळी गावकुसाबाहेर राहणाऱ्या या अस्पृश्‍य समाजाने प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली. तरीही त्यांचे प्रश्‍न सुटले असे नाही. गावखेड्यात राहणारा बौद्धबांधव आजही उपेक्षित आहेत. गावखेड्यातील शिक्षणाचे प्रमाण कमी झाले आहे. शहरातील प्रगतील वाव आहे. मात्र, प्रत्येक जण इथे येऊ शकत नाही. आपल्या बांधवांच्या प्रगतीकडे शहरात आलेले युवक दुर्लक्ष करीत आहे, हे या समाजापुढील मोठे आव्हान आहे.
बाबासाहेबांनी खरे तर साऱ्या अस्पृश्‍यांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा केला. महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे तर अस्पृश्‍य समाजात 59 विविध जाती मोडतात. पण, त्यांचा विकास किती झाला, याचा आढावा घेणे गरजेचे आहे. 59 जातींमधील फक्‍त महार म्हणजेच धर्मांतरित बौद्धांचा बऱ्यापैकी विकास झाला आहे. तो कुठेतरी स्थिरावत आहे. मात्र, 58 जातींचे प्रश्‍न आजही गंभीर आहेत. त्यांना अद्याप बाबासाहेब कळले नाहीत. त्यातील अनेक जण तर बाबासाहेब फक्‍त बौद्धांचे, असे म्हणतात. हे अपयश कोणाचे? सरकारचे की बाबासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या बौद्धांचे? बाबासाहेबांनी "भारत बौद्धमय करेन', असे स्वप्न बघितले होते. ते पूर्ण झाले काय?, याची चिकित्साही 60 वा धम्मदीक्षेचा सोहळा साजरा करताना करणे गरजेचे आहे. देशातील अस्पृश्‍यांसमोर अनेक गंभीर प्रश्‍न आहेत. महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. नोकरी नसल्यामुळे युवक गुन्हेगारीकडे वळत आहेत. शेती रसातळाला गेली आहे. खासगीकरणामुळे आरक्षण धोक्‍यात आले आहे. शिक्षण महागले आहे. दुसरीकडे, भौतिक सुखाची मागणी वाढली आहे. आणि त्याची चटक लागलेला एक नवा वर्ग उदयास आला आहे.
गेल्या 60 वर्षांत धम्मदीक्षेचे अनेक सोहळे साजरे झाले आणि येणाऱ्या काळात ते अधिक उत्साहपूर्वक साजरे होतील यात शंका नाही. पण, कधी बाबासाहेबांच्या "भारत बौद्धमय करेन', या विचाराकडे कोणी लक्ष दिले काय, हा प्रश्‍न प्रत्येक बौद्धाने स्वतःला विचारणे आवश्‍यक आहे. याचे उत्तरही स्वतः शोधावे म्हणजे आपण खरेच बाबासाहेबांचे अनुयायी आहोत काय, याचे उत्तर मिळेल.

-चंद्रशेखर महाजन, नागपूर. मो. 9850209710