Pages

Friday, 7 October 2022

...या अधिकाऱ्यांनी गाजविली दीक्षाभूमी!

 दीक्षाभूमी. सामाजिक कार्यकर्त्यांपासून तर राजकीय नेत्यांच्या वर्दळीचे पवित्र ठिकाण. गेल्या काही वर्षांत राजकीय नेत्यांच्या कोलांटउड्यांमुळे ते विश्वास पात्र राहिले नाही. शे-दोनशे कार्यकर्ते घेऊन आता ते नेते राष्ट्रीय परिषदा आणि मेळावे घेत आहेत. कधीकाळी याच नेत्यांचे भाषण ऐकण्यासाठी समाजातील लोकांची रीघ लागायची. मात्र, राजकीय नेत्यांच्या भूमिका वारंवार बदलत राहिल्याने नेते फक्त मोजक्या कार्यकर्त्यांपर्यंत मर्यादित झाले.

 नेत्यांमुळे निर्माण पोकळी झालेले पोकळी सध्या समाजातील अधिकाऱ्यांनी भरून काढली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भरसाठ संघटना आता दीक्षाभूमीवर दिसू लागल्या आहेत. पण, त्यांनाही मर्यादा असल्याने पुस्तक, भोजन आणि संघटनांचे भाषण वगळता त्यांच्यातही दम राहिला नाही. दीक्षाभूमीवर एक बोलून कार्यालयात गेले की त्याच्या उलटे वागण्याच्या प्रकारामुळे अधिकाऱ्यांविषयी समाजात फारशी आस्था दिसून येत नाही. असे असले तरी यावर्षी दीक्षाभूमीवर दोन अधिकाऱ्यांची वर्दळ सर्वांच्या नजरेत भरण्यासारखी होती. त्यातील एक म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आणि दुसरे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये. या दोन्ही अधिकाऱ्यांनी दीक्षाभूमी पिंजून काढली, असे म्हणावे लागेल. गेल्या दोन दिवसात दोन्ही अधिकाऱ्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. अनेक लोकांच्या भेटी घेतल्या. प्रदर्शनाला भेट दिली. जातपडताळणी शिबिर घेऊन अनेकांना दिलासा दिला. बार्टीच्या बुकस्टॉलवर संविधान आणि इतर पुस्तकांवर ८५ टक्के सवलत दिली. 

यासोबत दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळ्याला हजेरी लावली. एका भेटीदरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांची समाजाप्रती बांधिलकी आणि तळमळ दिसून आली. विभागाच्या योजना प्रत्येकांपर्यंत कशा पोहचविता येतील, यावर चर्चा केली. सामाजिक न्याय विभाग आणि बार्टींच्या योजनाच समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत कशा पोहोचल्या जातील आणि त्याच्या नियोजनावर त्यांनी भर दिला. पारशिवनी तालुक्यातील शाळांमधून पहिल्या वर्गात जातप्रमाणपत्र देण्याचे अभियान सुरू केले. येणाऱ्या काळात हे अभियान अधिकच लाभदायक राहणार हे यात शंका नाही. दोन्ही अधिकाऱ्यांची तळमळ बघून त्यांचे कौतुक आणि त्यांच्या कामाला दाद देण्यावाचून राहणे शक्य नाही. त्यांच्यासोबत नागपूर विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली. या   सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आणि बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये या दोघांनाही सप्रेम जयभीम, त्यांच्या कामाला भरभरून शुभेच्छा!


-चंद्रशेखर रामदास महाजन 
प्लॉट क्र. ५९, जनसेवा हाउसिंग सोसायटी, भारत गोडावूनच्या मागे, नीलकमलनगर, 
नरसाळा रोड, नागपूर. 
मो. ९८५०२०९७१०

No comments:

Post a Comment