Pages

Tuesday, 12 May 2015

बसपला रिपाइंची लागण

बसपला रिपाइंची लागण


समाजाला राजकीय सरंक्षण मिळावे आणि यातून विकास साधावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय पक्षाला महत्व दिले. म्हणूनच त्यांनी हयातीमध्ये कामगार पक्ष आणि शेडयुल कास्ट फेडरेशन सारख्या पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाला चांगले दिवस दाखविले. शेडयुल कास्ट फेडरेशनचे एका काळामध्ये 15 आमदार मुंबई प्रातांतून निवडून आले होते. मात्र, शेडयुल कास्ट फेडरेशन पेक्षा सर्वसमावेशक असलेला पक्ष त्यांना हवा होता. म्हणून त्यांची पंजाबराव देशमुख यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांची चर्चा करून भारतीय रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली. मात्र, दरम्यान त्यांचे महापरिनिर्वाण झाले. आणि रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आला तो यशवंतराव आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, बॅरिॅस्टर राजाभाउ खोब्रागडे आणि इतर नेत्यांच्या संकल्पातून. सुरूवातीपासून हा पक्ष फुटीच्या उंबरठयावर राहीला. दादासाहेब गायकवाड आणि राजाभाउ खोब्रागडे यांच्यामध्ये मतभेद झाले. पक्ष फुटला. बॅरि. खोब्रागडे यांनी खोरीपा काढला. आजही तो पक्ष फक्‍त निवडणुकापुरता जिवंत आहे. यानंतर या पक्षाला फुटीचे ग्रहण लागले. ते आजतागायत सुटले नाही. गल्लीगल्लीमध्ये रिपाइं नावाचे राष्ट्रीय पक्ष झाले आणि दहा लोक त्यांच्या मागे नसतांनाही नेते राष्ट्रीय अध्यक्ष झाले. सर्वच पक्ष बाबासाहेबांच्या विचारावर निवडणुका लढवित आहेत. मात्र, त्यांचा एकही लोकप्रतिनिधी विधानसभेत नाही. 80 च्या दशकामध्ये मा. कांशीराम नावाचा झंझावात महाराष्ट्रात उदयास आला. पुणे येथील सरकारी नोकरी सोडून त्यांनी बाबासाहेबांचे विचार सर्वत्र पेरण्याची महत्वाकांशा घेवून कांशीराम महाराष्ट्रातील गल्लोगल्लीत सायकलने फिरले. रिपाइं नेत्यांना शिव्याशाप दिल्या.मात्र, ना नेते एक झाले आणि नाही जनता पुढे आली. शेवटी त्यांनी बसप नावाचा पक्ष स्थापन केला. बामसेफ नावाच्या कर्मचारी संघटनांनी त्याला भरभरून आर्थिक मदत केली. महाराष्ट्रात पाय रोवता येत नाही म्हणून त्यांनी युपी आणि पंजाब राज्यामध्ये पक्ष बांधणीला सुरूवात केली. महाराष्ट्रातील रसद घेवून त्यांनी युपीमध्ये पक्ष बांधला. लोकांनाही पक्ष आवडला आणि बसपचे कॅडरबेस तयार झाले. गावागावांमध्ये कॅडर झाले. मात्र, त्यांनाही महाराष्ट्रात 30 वर्षांनंतरही राजकीय यश आले नाही. उत्तर प्रदेशात मायावती पाचदा मुख्यमंत्री झाल्यात. दिल्ली, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश या ठिकाणी त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून आले. महाराष्ट्रात मात्र, त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्यावर छाप पाडता आली नाही.
अनेक वर्षे पक्षात काम करूनही एकही आमदार निवडून येत नाही. यामुळे बसपचे नेते सैरभर झाले. त्यांच्यातही फुट पडली. श्रीकृष्ण उबाळे सारखे नेते त्यांच्यापासून दूर झाले. पक्ष स्थापनेतील अनेक नेते बसपपासून दूर झाले. ओबीसींना एक करण्यासाठी महाराष्ट्रातील बसपचे बौध्द कार्यकर्ते कामाला लागले. मात्र, गेल्या निवडणुकीमध्ये जो ओबीसी जनाधार होता तो सुध्दा त्यांच्याकडे राहीला नसल्याचे स्पष्ट झाले. देशात 19 खासदारपर्यंत मजल मारलेल्या बसपला एकही खासदार निवडून आणता आला नाही. मात्र, ओबीसींना जागे करण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्रातील जो काही बौध्द मतदार होता तो सुध्दा त्यांच्यापासून दूर होत आहे. समाजातील लोकांना संघटीत करण्याचे सोडून सोशल इंजिनिअरिंग केले. मात्र, ते सर्वत्र फसल्याचे दिसून येते. युपीतील सत्ता सोशल इंजिनिअरिंगमुळे आली असेल यात शंका वाटत आहे. पक्षाला बेस हवा आहे. मात्र, बसपला महाराष्ट्रात अद्यापही बेस तयार करता आला नाही. फक्‍त निवडणुकीपुरता उगविणारा पक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात आहे. समाजाच्या प्रश्‍नांवर कधी तो मैदानात उतरला नाही. मोर्चे, आंदोलन करून सत्ता मिळत नाही किंवा प्रश्‍न सुटत नाही, असा त्यांचा विचार आहे. आधी सत्ता द्या, नंतर प्रश्‍न सोडवितो, असे त्यांचे श्रेष्ठी सांगतात. यामुळे समाज त्यांच्यावर नाराज आहे. सध्या बसपची अवस्था "ना घरकी ना घाट' झाली आहे. ज्या समाजाच्या भरोश्‍यावर राजकारण करीत होते त्यांचे प्रश्‍न सोडविता आले नाही. तसा दबावगटही तयार करता आला नाही. ओबीसींना संघटीत करण्याचे त्याचे प्रश्‍नही फळास आले नाही. ओबीसी नेते त्यांच्याकडे भरपूर आहेत. मात्र, ते नेते स्वतःच्या घरातील मते बसपला मिळवून देण्यास अपयशी ठरले आहेत. ओबीसी नेत्यांना बसपमध्ये का गेले म्हणूनच घरूनच मोठयाप्रमाणात विरोध होतो आहे. त्याचा परिणाम 2014 मध्ये देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीवरून दिसून आले. "जात नाही ते जात' प्रत्येकांच्या डोक्‍यात असल्याने बसपही या"जात'पासून सुटला नाही. त्याचे परिणाम समोर आहेत.
बसपचा पाया मजबूत करणारे नागपूर. महानगर पालिकांमध्ये त्यांचे 10 नगरसेवक आहे. पूर्वी 12 होते. पण, गेल्या काही दिवसांपासून बसपला रिपाइंची लागण झाली. नगरसेवक किशोर गजभिये, असो डॉ. माने असो. यापूर्वीही ही लागण झाली. मात्र, श्रेष्ठीपुढे कोणीही मोठा नाही, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी होते. आता उघउउघड रिपाइं होत आहे. फक्‍त रिपाइं सारखे बसप(एम) किंवा बसप(जी) तसेच अनेक कंशातील नावे लागणे फक्‍त शिल्लक आहे. सध्या बसपचा हत्ती धोक्‍यात आहे. यामुळे त्याचे फायदा हे फुटीर नेते घेण्यास मागे पुढे पाहाणार नाहीत.
नगरसेवक किशोर गजभिये किवा डॉ. माने आणि इतर त्यांसोबत किंवा त्या नेत्यांनी जो प्रकार सुरू केला आहे. तो बसपला पुन्हा मागे घेवून जाणारा आहे. 30 वर्ष पक्षासाठी काम करूनही सत्ता मिळत नसल्याचे नेते हताश झाले आहेत. काळयाचे पांढरे झाले. पण, साधे नगरसेवक होता आले नाही, याची खंत त्यांना आहे. ऐवढेच काय तर आमदार किंवा खासदारकीची उमदेवारी मिळाली तरी बरे म्हणणारे कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही, याची खंत आहे. कारण ऐववेळी उमेदवार आयात करण्याची बसपची खेळी त्यांच्यावर उलटत आहे. निवडून आले नाही तरी चालेल पण पक्षाची उमेदवारी मिळाली असती तर बरे झाले असते, असे म्हणणा-यांची संख्या वाढत आहे. अशा नैराशातून कार्यकर्ते वेगळी भूमिका मांडत आहेत. त्याचे परिणाम बसपला आज दिसणार नाहीत. मात्र, भविष्यात ते दिसून येतील. तेव्हापर्यंत फार उशीर झालेला असेल. बसपची रिपाइंपासून सुटका करायची असेल तर आत्ताच सावध झालेला बरे. पक्षात हेवेदावे असतात. यात वाद नाही. मात्र, ते पक्षाबाहेर दिसायला नको.
-चंद्रशेखर महाजन
9850209710


No comments:

Post a Comment