मित्रा, गेल्या अनेक दिवसांपासून बघतो. बौध्द धम्माविषयी बोलताना सर्वप्रथम महाराष्ट्रातील "महार' या जातीवरच अधिक भर दिला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतल्यानंतर हजारो वर्षांपासून गावकुसाबाहेर खितपत पडलेल्या या समाजाला नवी दिशा मिळाली. मात्र, लगेच दोन महिन्यानंतर बाबासाहेब यांचे महापरिनिर्वाण झाले. यामुळे बौध्द धम्म कळायच्या हातच आपण पोरके झालो. आधीच आपणासमोर समस्या. गावाबाहेर राहून यातना भोगने, दुसरीकडे अर्थसंकट, बौध्द वस्त्यावर झालेले हल्ले. महिलांवर अन्याय, अत्याचार त्यातच ग्रामीण भागातीाल बौध्द बांधव अशिक्षित, अशा विविध समस्यांनी ग्रासलेला बौध्द बांधव. आज काही अंशी विविध क्षेत्रामध्ये मोठी झेप घेत आहे. आजही ग्रामीण भागामध्ये बौध्दांच्या हातचे पाणी पिणे गुन्हा मानला जाते. याची दाहकता कमी झाली आहे. मात्र,यातून राजकीय द्वेष आणि इतर रोजागार तसेच निगडित ठिकाणी बौध्दांवर अन्याय होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञामुळे समाजाचे भले झाले आणि भले होत आहे. बौध्द बांधव सुसंस्कृत होत आहेत. समाजावर विविध प्रकारे अन्याय आणि अत्याचार होत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत दलित समाजातील प्रत्येक घटकांनी दीक्षा घेतली नाही. दलित समाजातील अनेक समाज घटक बौध्दांचा द्वेष करतो. ऐवढेच बाबासाहेब आंबेडकरांना सुध्दा त्याच पंक्तीमध्ये बसवतो. तसेच दलित समाजातील काही पंथ आहेत त्यांनी सुध्दा बौध्द धम्म स्वीकारला नाही. यामुळे तुम्हाला गणपती पूजा, हिंदूचे इतर सण,उत्सव साजरे करताना दिसत आहेत. याचा अर्थ असा नाही की, बौध्द समाजातील सर्वच लोक असे प्रकार करतात.
तु जे म्हणतो, आत्मपरिक्षण करण्याचे. आत्मपरिक्षण केले तर आजचा बौध्द बांधव फार पुढे गेला आहे. औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात फार पुढे गेला आहे. जर बौध्द धम्माची त्याला जाणीव नसती तर दीक्षाभूमिवर धम्मचक्र परिवर्तन दिनाला जो लाखोच्या संख्येने बौध्द बांधव येतो. तो दिसला नसता. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारा हा बौध्द बांधव खऱ्या अर्थाने बौध्द झाला आहे आणि तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचावरच चालतो आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर उर्वरित दलित समाजाच प्रश्न आहे. त्यांनी कधीच बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारले नाही. तो महारातील पंथाचा असतो की हिंदू दलित असतो. तु जे बोलतो हे मला चुकीचे वाटत नाही. मात्र, नेहमीच निगेटीव्ह विचार समाजापुढे आल्यानंतर समाजातील चांगले गुण दिसून पडत नाहीत. आपण कुठे चुकलो हे मांडत असताना आतापर्यंत आपण किती प्रगती केली, याचाही पॉझीटीव्ह विचार समाजापुढे यायला पाहीजे. प्रत्येक जण चळवळ मागे गेली. चळवळ संपली, असे सांगत सुटत आहे. मित्रा, बाबासाहेब ही व्यक्ती नाही तर विचार आहे आणि विचार कधीच संपत नाही. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करणारी कॉंग्रेस बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय सत्तेत येत नाही. भाजपलाही आता बाबासाहेब कमी पडायला लागले आहेत. शिवसेनाही भीमशक्ती आणि शिवशक्तीची मोट बांधत आहे. बहुजन समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रूजू लागले आहेत. आपण फक्त समाजापुरता विचार केल्यामुळे मागे गेल्याचे दिसत आहेत. बाबासाहेबांची चळवळ संपली असती तर दीक्षाभूमिवर लाखोंच्या संख्येने येणारा बौध्द समाज येथे आलाच नसता. बौध्द समाजातील काही लोक चळवळी संपल्याचे जाहीर करून राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरे असे की नेहमीच नकारात्मक विचार ठेवण्यापेक्षा सकारात्मक विचार ठेवले तर समाजाचे भले होईल.
बौध्द समाजात नागपूरमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहे. उद्योजक पुढे येत आहे. डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे, पद्श्री कल्पना सरोज, इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. खोब्रागडे, किशोर गजभिये,इ.झेड. खोब्रागडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष प्राचार्य जानराव गजभिये,बिल्डर शेळके, हाडके, धम्मपाल पाटील, डॉ. सुरेश मान, सिध्दार्थ पाटील, अरविंद गजभिये असे अनेक बौध्द बांधव समाजाच्या प्रगतीसाठी चांगले उपक्रम राबवित आहेत. कास्ट्राईब संघटना,पब्लिक फाऊडेशन, इतर लहान मोठया संघटना बाबासाहेबांचे विचार समाजापुढे आणीत आहेत. लार्ड बुध्दा, आवाज इंडिया यासारख्या बौध्द वाहिन्या सुरू आहेत. असे अनेक उपक्रम आपण समाजासमोर ठेवले तर समाजबाधंवाचा स्वाभीमान जागृत होईल. अन्यथा त्यांच्यासमोर सर्वच काही नकारात्मक विचार ठेवले तर त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होईल आणि आपला कोणी सरंक्षण नाही, असा गैरसमज करून ते पुन्हा वैचारिक, आर्थिक गुलामगिरीकडे वळू शकतात. मित्रा, यापुढे विचार मांडताना काय केले पाहीजे यावरही भर दिला पाहीजे. चुकले तर फटके मारलेच पाहीजे.
- चंद्रशेखर महाजन
No comments:
Post a Comment