Pages

Thursday, 23 April 2020

चला गावाकडच्या बौद्धांकडे!

संग्रहित छायाचित्र
आंबेडकरी चळवळीला गती देणारे धम्मचक्र बुद्धविहाराच्या कोपऱ्यात गंजले आहे. विहाराच्या भिंतींचा निळा रंगही फिका पडला आहे. त्याला भडक करण्याची गरज आहे. मात्र, ती ताकद आता 70 वर्षांच्या वृद्धाच्या मनगटात नाही. त्याला आस आहे ती शहरातील रसदीची. मात्र, ती मिळणार काय, याचाही तो विचार करीत आहे. आंबेडकरी वारसा गोठ्यातील कोपऱ्यात शेवटच्या घटका मोजत आहे. त्याला बौद्ध तत्त्वज्ञानाच्या सलाईनची मात्रा हवी आहे. म्हणून आता गावाकडे चला.


बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी धम्मदीक्षा दिल्यानंतर गावकुसाबाहेरील मुका महार बोलायला लागला. त्याच्या अंगात ताकद यायला लागली. ओठांवर शब्द फुटायला लागले. बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म समजू-उमजू लागला. आता त्याला 67 वर्षे होत आलीत. त्याला बुद्ध कितपत समजला हा भाग अलाहिदा. मात्र, तो आता माणसात आला. प्रगतीच्या वाटा दिसायला लागल्या. समाजाचे, स्वतःचे भले तो शोधू लागला. सवलतीपेक्षा त्याला धम्म आणि बाबासाहेब जवळचा वाटू लागला.

"महार' हजारो वर्षांपासून ढोंगी वर्णव्यवस्थेच्या उखळात भरडून निघाला. गावाचे संरक्षण करणारा हा शूर समाज केव्हा गावातील लोकांसाठी अस्पृश्‍य झाला, हे त्यालाही कळले नाही. चोर, डाकू आणि हिंस्र श्‍वापदांपासून गावाचे रक्षण करण्यासाठी हा वेशीवर आला आणि वेशीचाच झाला. तो वर्णव्यवस्थेच्या जुलमी तुरुंगात अस्पृश्‍य म्हणून कायमचा बंदिस्त झाला. या समाजाला महात्मा जोतिराव फुलेंपासून तर अनेक थोर महात्म्यांनी मुक्त करण्याचा प्रयत्न केला. वर्णव्यवस्थेचे साखळदंड इतके मजबू होते की, त्यांनाही ते तोडता आले नाही. महात्मा फुले यांनी पुण्यात पाण्याचा हौद उघडा केला. अस्पृश्‍यांसाठी शाळा सुरू केली. तरीही वर्णव्यवस्थेतील कुटिल समाजरक्षकांनी त्यांना जवळ घेतले नाही. म्हणूनच ब्रिटिशांच्या गुलामगिरीपेक्षाही तो वर्णव्यवस्थेतील गुलामगिरीत फार रसातळाला गेला.
म्हणून या समाजासाठी मुक्‍तिदाता ठरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना लहानपणापासून वर्णव्यवस्थेचे चटके बसले. बाबासाहेब हे अस्पृश्‍य समाजातील पहिले दहावी पास विद्यार्थी. त्यांच्या जिकरीने समाजाचे मनोधैर्य वाढले. तेव्हापासूनच या समाजाच्या उत्थानाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांच्यातील संकुचितपणा कमी होऊ लागला. बाबासाहेबांची प्रगती ही त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरू लागली. बाबासाहेबांवर जिवापलीकडे प्रेम करणारा हा समाज, त्यांच्या अखेरपर्यंत त्यांच्या सोबत राहिला.

14 ऑक्‍टोबर 1956नंतर खऱ्या अर्थाने अस्पृश्‍य समाजाची प्रगती होऊ लागली. बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर अस्पृश्‍य समाजातील प्रत्येक जातीने बौद्धधम्म स्वीकारला नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचे बाळकडू त्यांना मिळाले नाही किंवा त्यांनी वर्णव्यवस्थेतील गुलामगिरीमुळे घेतले नाही.
अन्याय, अत्याचार आणि जुलमामुळे नेहमीच शिक्षेला पात्र ठरलेल्या समाजाला "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला. या समाजाने हा मंत्र प्राणापेक्षाही अधिक जपला. घरी अठराविश्‍वे दारिद्य्र असतानाही एक वेळ उपाशी राहून, तर कधी मीठभाकर खाऊन मुलाबाळांना शिकवू लागला. मुलांच्या शिक्षणासाठी पदरमोड करू लागला. मुले शिकू लागली. महारवाडा आता बौद्धवाडा झाला. गावातील इतर समाजांतील मुलांपेक्षाही शिक्षणाची टक्‍केवारी बौद्धवाड्यात वाढू लागली. मुलांनी शिक्षण घेतले तरी त्यांच्या अस्पृश्‍यतेचा भेदभाव कमी झाला नाही. गावातील सुधारणावादी लोक फक्‍त भाषणापुरते अस्पृश्‍यता संपल्याचे सांगत होते. परंतु, ते खरे नव्हते. 1990पर्यंत गावातील अस्पृश्‍यता पाणवठ्यावर दिसत होती. तरीही बौद्ध समाज याला जुमानत नव्हता. स्वच्छ, नीटनेटके राहणे आणि तेही ऐटीत, हा त्यांचा आता स्वभाव झाला. याचा परिणाम असा झाला की, अस्पृश्‍यता पाळणाऱ्यांनाही लाज वाटू लागली. हाच बौद्ध युवक आता सज्ञान झाला. शिक्षणाचे चीज करण्यासाठी गाव सोडू लागला. शहराकडे धाव घेतली. गावागावांतून आलेला बौद्ध युवक शहरात एकोप्याने आणि संघटितरीत्या राहू लागला. समाजाचे प्रश्‍न तो मांडू लागला. शहराकडे चला, असे अनेकदा भाषणातून बाबासाहेबांनी सांगितले होते. युवक आता शहरात आला. संघटित राहू लागल्याने त्यांचे प्रश्‍न सुटायला लागले. अन्यायाविरोधात बंड करण्याची ताकद त्यांच्यात एकवटली. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये बौद्धवस्त्या वसू लागल्या होत्या. अस्पृश्‍यतेवर शहरातील युवकांनी मिळविलेला हा तात्पुरता विजय होता. शहरातील युवकांनी एकजूट होऊन विकासात हातभार लावला. युवकांचे जत्थे चळवळीसाठी काम करू लागले. गावातील शिकलेल्या युवकांना शहरातील बौद्ध युवक आधार वाटू लागला. एकापाठोपाठ एक अशी युवकांची फौज शहरात आली. तिला रिपब्लिकन चळवळीचे नाव मिळाले. घराघरांमध्ये कार्यकर्ता निर्माण झाला. सभा, संमेलने होऊ लागली. अधिकारी झाले. मोठी पदे मिळाली. एवढेच नव्हे, तर रिपब्लिकन कार्यकर्ता सत्तेत भागीदार झाला. नगरसेवकापासून तर आमदारापर्यंत त्यांची मजल गेली. साहित्य, चळवळ, आंदोलन, शिक्षण, राजकारण, समाजकारणासह अनेक क्षेत्रांत त्यांनी झेंडा रोवला. शहरातील झोपडपट्ट्यांतील घरे आता एकमजली-दुमजली होऊ लागली. सत्तासंघर्षासाठी संघर्ष होऊ लागला. रिपब्लिकन चळवळ, रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन स्टुडंड फेडरेशन झाली. वॉर्डावॉर्डांत भारतीय बौद्ध सभेच्या शाखा झाल्या. समता सैनिक दल संरक्षणासाठी दिमतीला आला. पूर्वाश्रमीचा महार आता बौद्ध झाला. दोन पैसे खिशात आले. शहरातील बौद्ध सुधारला. मात्र, गावातील बौद्धांचे काय, हा आता मोठा आणि तेवढाच गंभीर प्रश्‍न बौद्धांसमोर निर्माण झाला.

गावातील बौद्धांचे काय?
गावातील बौद्ध. फाटक्‍या धोतराने शरीर झाकणारा. शरीरावरच्या बंडीला सतरा भोके पडली तरी रोज धुऊन पुन्हा घालणारा. बाबासाहेबांच्या चळवळीला समर्पित असलेला बौद्ध. हालअपेष्टा सहन करून वारलीचुरली भाकर तिखटमीठ लावून पोट भरणारा बौद्ध. अस्पृश्‍यतेचे चटके कायम सहन करणारा हा बौद्ध बाबासाहेबांच्या चळवळीला जागला. आतड्या सुकेपर्यंत आणि शरीरावरची हाडे स्पष्ट दिसेपर्यंत मेहनत करणारा बौद्ध शिक्षणाला शिवला. पंचशीलाचे पालन करून लागला. वाईट कामे सोडून दिली. अस्वच्छ कामे सोडून दिली. कामे सोडल्याने प्रपंचाचा प्रश्‍न निर्माण झाला, तरी तो फाटक्‍या पण नेटक्‍या वस्त्राने जगू लागला. पोराला शिकवू लागला. प्रत्येक घरात शिकलेला युवक दिसू लागला. अख्खा बौद्धवाडा शिकला. शिकला, पण अशा समस्याही वाढल्या. त्यावर तोडगा म्हणून शिकलेले युवक गावातून शहरात वसले. मायबापाने काबाडकष्ट करून, प्रसंगी उपाशी राहून त्याला शिक्षण दिले. होत्याचे नव्हते करून त्याने पोराला तब्बल पदवी आणि त्यानंतरही शिकविले. गावात काम नाही आणि शिक्षणाला कोणी विचारत नाही म्हणून तो गावातच निराश झाला. त्यात भर घातली ती अस्पृश्‍यतेने. शिकल्यासवरलेल्या मुलाला काम नाही म्हणून बापही चिंतेत. पोटाचा चिमट घेऊन पोराचे शिक्षण पूर्ण केले. स्वतःचे उद्‌ध्वस्त आयुष्य उजळण्यासाठी प्रसंगी रक्‍ताचे पाणी केले. गुराढोरासारखा शेतात राबला. ऊनपावसात राबताराबता शरीराची कातडी गेंड्यासारखी झाली; तरीही मुलाला शिक्षण दिले. पोरगा शहरात गेला तो कायमचा शहराचाच झाला. एकापाठोपाठ एक अशी संपूर्ण युवकांची पिढी शहरात गेल्याने बौद्धवाडे आता भकास दिसू लागले.
गेल्या 65 वर्षांतील बौद्धवाड्यातील भकासपणा आता ग्रामीण भागात तीव्रतेने जाणवू लागला आहे. नोकरीसाठी घराबाहेर पडेलला युवक आता गावाकडे फिरकूनही पाहता नाही. 20 वर्षांपूर्वी गाव सोडलेला पूर्वी सहा महिन्यांत, नंतर वर्षातून, आता ढुंकूनही पाहत नाही. सुणासुदीला गजबजलेल्या बौद्धवाड्यात आता शुकशुकाट आहे. मातीची घरे पडकी झाली. 40 वर्षांपूर्वी तरणाताठा असेला तरुण आता कंबरेतून झुकला आहे. शरीरावरचे मांस सैल झाले. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या. बौद्ध वस्तीतला बैठकांचा मंच आता ओस पडला. पोराचे शिक्षण, नंतर नोकरीसाठी जमीन विकणारा शेतकरी बाप आता ठलवा झाला. पोराचे शिक्षण झाल्यावर स्वतःचे अस्तित्व शोधणारा बौद्ध बाप आता फक्‍त मुलाला शोधत आहे. कच्चे रस्ते डांबरीकरण होऊन पक्‍के झाले. तरीही बापाचा शोध संपला नाही. पोराच्या शोधात आई खंगली. हातात काठी घेऊन बौद्धवेशीवर मोतीबिंदू झालेल्या डोळ्यांनी पोराची वाट पाहत आहे. बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती आता फक्‍त त्रिशरण-पंचशीलापुरती उरली आहे. पंचशील झेंडाही आता शिकल्या सवरल्यांची वाट पाहून थकला आहे. अनेक वर्षांपासून धुऊन-धुऊन बुद्धविहारांवर फडकणारा निळा झेंडाही कुजला. सायंकाळी मेणबत्तीने उजळून निघणाऱ्या बुद्धविहारांत आता लख्ख प्रकाश आला, तरीही भिंती काळवंडलेल्या आहेत. उत्साह नाही. बौद्ध वस्तीत आता नैराश्‍य आहे. जे युवक आहेत, तेही आता बायकोपोरांचे झाले. वस्ती आता वस्ती राहिली नाही. काय झाले असे की, गावातील बौद्ध वस्त्यांत भरदिवसाही अंधार आहे? दलित वस्ती योजनेतून बांधलेले सिमेंटचे रस्ते चकाचक दिसतात. रमाबाई योजनेतून घरेही बांधली. कुळाची घरे हाता सिमेंटची झाली. मात्र, सिमेंटच्या त्या वस्तीत जीव नाही. माणसाचा राबता नाही. चळवळीची भाषा नाही. आंदोलनाची ठिणगी नाही. शिक्षणाची आस्था नाही. वाचनाची गोडी नाही. घराघरांतून ग्रॅज्युएट निघणारे युवक नाहीत. काय झाले बौद्ध वस्तीला? अन्यायाविरुद्ध चीड नाही. रक्‍त थंड झाले. बाबासाहेबांनी शोषणाविरुद्ध पेटविलेली ठिणगी दिसत नाही. शारीरिक गुलामगिरीतून निघालेली पिढी आता मानसिक गुलामगिरीत तर अडकली नाही? नोकरी, पैसा यातून मेंदू तर बधिर झाला नाही? पूर्वी अस्पृश्‍यतेने नागवलेला महार आता वैचारिक गुलामगिरीत तर गेला नाही? ऐशआरामातून रक्‍ताच्या धमन्यांतील अंगार तर विझला नाही? काय झाले असेल, हा विचारही मनाला सुन्न करून जातो.
एकूणच गावातील बौद्धांची ही परिस्थिती आहे. शिकलेला युवक आता गावातील बौद्धांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याचे दुष्परिणाम आता दिसायला लागलेत. एकूणच काय तर गावकुसातून सुरू झालेली आंबेडकरी चळवळ त्याच गावात अधू झाली आहे. गावातील वृद्धांच्या खांद्यावर ती शेवटचे आचके देत आहे. ओसरी आता नि:शब्द झाली. घरातील कवाडे घरातून बाहेर पडलेल्या युवकांची वाट पाहत आहेत. आंबेडकरी चळवळीला गती देणारे धम्मचक्र बुद्धविहाराच्या कोपऱ्यात गंजले आहे. विहाराच्या भिंतींचा निळा रंगही फिका पडला आहे. त्याला भडक करण्याची गरज आहे. मात्र, ती ताकद आता 70 वर्षांच्या वृद्धाच्या मनगटात नाही. त्याला आस आहे ती शहरातील रसदीची. मात्र, ती मिळणार काय, याचाही तो विचार करीत आहे. आंबेडकरी वारसा गोठ्यातील कोपऱ्यात शेवटच्या घटका मोजत आहे. त्याला बौद्ध तत्त्वज्ञानाच्या सलाईनची मात्रा हवी आहे. म्हणून आता गावाकडे चला. नाही तर आंबेडकरी वारसाच गेल्याची खबर येईल आणि स्मशानभूमीपर्यंत खांद्यावर नेण्याची दुर्दैवी वेळच या शहरी आंबेडकरी चळवळीवर येईल. चला...चला.. गावाकडे चला... गावच्या बौद्धांकडे चला.

-चंद्रशेखर महाजन
प्लॉट क्र. 59, जनसेवा हाउसिंग सोसायटी,
नीलकमल नगर, भारत गोदामाच्या मागे,
नरसाळा रोड, नागपूर.
मो. 9850209710

1 comment:

  1. खूप छान लिहिता तुम्ही,,,महत्वाचे मुद्दे हाताळले तुम्ही

    ReplyDelete